top of page

उशीर

स्वार्थासाठी जो तो, फक्त आपल्यापुरतं पाहे,

तिथं नातं होतं एकच – “गिऱ्हाईक आणि बाई” हे.


नाच आणि गाणी, स्वागत करी फुलदाणी,

नियम होता एकच – “पुरवठा आणि मागणी”.


बाकी सगळं झूठ, तिथे महत्त्वाची नाणी,

जो मोजेल जास्त, त्यालाच मिळे राणी!


‘कामा’शी मतलब, बाकी देणं-घेणं नाही,

कुणीच इथं कुणाच्या खोलात शिरत नाही.


चमचम होती वरून, आत नांदत होत्या व्यथा,

सत्य आलं ओरडत, तिथे घडली एक कथा!


एक होता नर, आणि होती एक नारी,

तिची बातच काही और, त्याला होती फार प्यारी.


त्याला दुसरं कुणी नको, तिच्यासाठी त्याचा हेका,

त्याच्या ध्यानिमनी नाही, प्रसंग येणार आहे बाका!


होता उभा नी आडवा, त्याचा थाट होता रांगडा,

त्याला काय माहित, तो होणार आहे लंगडा!


एक दिवस अचानक, एक सत्य त्याला कळलं,

नुसत्या कल्पनेने त्याच्या, त्याला खूप बरं वाटलं!


शरीराहूनही छान, असं खूप काही असतं,

तेच राहतं टिकून, आणि बाकी सारं फसतं!


त्याच्या मनानं घेतलं, हिला “घरवाली” करायची,

अगदी उद्याच ही इच्छा, बोलून तिला दाखवायची.


तिच्या मनाचा कौल त्यानं कधीच जाणला होता,

आणि म्हणूनच तिच्यासाठी गजरा घेतला होता!


पहाटेचं चांदणं त्याच्या मनामध्ये उगवलं,

जणू संपला आता काळोख, अन् सारं त्याला मिळालं.


सवयीने आपोआप त्याची पावलं तिकडे वळली,

बाहेरचा गलका पाहून तिथंच थोडी थांबली…


नुकतंच होतं उजाडत आणि रात्र होती सरली,

बातमी त्याला कळली – ती जगी नाही उरली…!!


तो सैरभैर झाला, त्याचा विश्वास नाही बसला,

जीव झाला गोळा, तिच्या खोलीकडे धावला…


ठोकाच त्याचा चुकला, अन् रक्त गेलं गोठून,

उन्मळून गेला, त्याच्या शिरा गेल्या तुटून…!!


रडत नव्हतं कुणी, त्याला सहन नाही झालं,

कुचकट बोलणं एवढ्यात त्याच्या कानावर आलं –


“गद्दार होती कारण, तिला ‘माया’ वाटत होती,

यार नको होता, आणि कुंकू मागत होती!!”


एकच गोष्ट सलत होती त्यांना राहून राहून –

आता बंद होणार ‘चलती’, साली मध्येच गेली निघून!


कुणीच नाही आलं, तिचं संपत आलं त्राण,

विझून गेल्या आशा, शेवटी ठेवला तिने प्राण…!!


“हं… मरताना म्हणे तिला गहिवरून आलं,

मान वळवून थरथरत तिनं याचं नाव घेतलं!”


माहित होतं तिला, तो येईल माझ्या दारा,

म्हणावं शक्य झाल्यास – एवढी इच्छा पूर्ण करा!


“देह माझा कधीच नव्हता, त्याचं काही करा,

करण्यापूर्वी फक्त… माझ्या भांगात कुंकू भरा…!!”


तो अंतस्थ झाला, सारे गोठून गेले विचार,

धीर त्याचा सुटला, तो झाला पुरा लाचार…


“काय केलंस हे? तुझी काय दशा झाली?

बोलली नाहीस कधी!… तुझा होणार होतो वाली!!


कसं सांगू – चिखलामधलं कमळ तू होतीस!

यांच्यात राहून यांच्यापेक्षा खूप वेगळी होतीस…!”


गजरा तिला वाहिला, अन् कुंकू भरलं भांगात,

भास त्याला झाला, तिचा प्राण आला अंगात!!


काळोखातच जगली… तिला लाभला नाही दिवस,

मनी चंद्राची आशा! तिच्या नशिबी होती आवस…!!


सारं त्याला कळलं, तेव्हा उशीर झाला होता…

कुडीमधून तिचा प्राण निघून गेला होता…

कुडीमधून तिचा प्राण निघून गेला होता…!!

 
 
 

Recent Posts

See All
The Trainman

Paul was a gold man A coal, glow and flow man It was in the city then He became a foreman Paul was a light man A bright, right and flight man On the track were his eyes set The strongest man you ev

 
 
 
The Loop of Bait by the Devil

I sit with a book, but my mind takes flight, Scrolling feels urgent, yet it steals my light. Tomorrow’s exam, but today’s a blur, A promise once made—forgotten, unheard. Reels whisper, "Just one more

 
 
 
Let me grow,Let me be me

Yashika, a five year old girl, playful and a little bit naughty, was a bundle of energy. A pure extrovert, she slipped home from school, humming to herself under the sun. As she reached home, her eyes

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page