मी भेळकरी
top of page

मी भेळकरी

By Amey Sachin Joag


मला जर कोणी विचारलं, की या जगामध्ये सर्वात सुंदर वास, सर्वात सुंदर आवाज, सर्वात सुंदर चव आणि सर्वात सुंदर दृश्य कोणतं? तर मी ह्या सगळ्याला एकच उत्तर देईन, "भेळेच्या ठेल्यावरचं". पुऱ्यांची पाकिटामधली कुरकुर, चिरले जाणारे कांदा-टोमॅटो-बटाटे-लिंबू आदी, भेळेच्या पातेल्यावर आपटणारा चमचा, पाकिटातून पुऱ्या उचलून त्यामध्ये भोक पाडताना होणारा आवाज, त्यांनी रगडा, आणि तिखट-गोड पाण्यामध्ये मारलेली बुडी हा सगळा आवाज, रगडा गॅसवर ठेवल्याबरोबर त्याचा सुटणारा वास, पाण्याचे डबे उघडल्यावर त्या पाण्याच्या वासाने लांबवर मारलेली मुसंडी, पुऱ्यांच्या अंगचा गंध, बशीमध्ये वाट बघत बसलेले कांदा-कोथिंबीर, ढवळले जाणारे रगडा, तिखट आणि गोड पाणी, पाकिटात कुरकुर करणारी शेव, भेळ बनवली जात आहे, हे सांगायला धावत सुटलेले टोमॅटोच्या रसाचे लोट, बशीभर दाणे आणि ह्या सगळ्यांनी सजलेली भेळ आणि हा सगळा घाट घालणारा तो भेळवाला. हे भेळवाले अक्षरशः चौफेर लक्ष ठेवून असतात. त्यांचा कोणता कान केव्हा काय ऐकतोय, कोणता डोळा केव्हा काय पहातोय हे कधीही कळत नाही. एखाद्याची मागणी ऐकून घेत असताना ते त्यांच्या शेजारी असलेल्या टपरीवाल्याशी गप्पा मारत असतात. एकवार गिऱ्हाईकाकडे बघत मागणी कळाल्याची पावती देतात. पुढची मागणी आली की पुन्हा एकवार त्या मागणी करणाऱ्या गिऱ्हाईकाकडे पाहून आपल्या हातात असलेली भेळ आपल्या समोरच्या गर्दीतून बरोबर ती भेळ मागितलेल्या माणसाला हुडकून काढत त्याच्या हातात देतात. एका हातात कुणाचं तरी पार्सलचं पुडकं बांधायला घेतलेलं, त्याच वेळेला कोणाची तरी 'दोन भेळ'ची ललकारी ऐकलेली, त्याला मानेनं हो म्हणणं, पुडक्याला दोरा गुंडाळत एका हातानं आधी आलेल्या ऑर्डरची तयारी म्हणून उचललेली पुरी, दुसऱ्या हातानं रटरटणारा रगडा ढवळला जातोय, त्याच वेळी चालू असलेल्या गप्पा, त्याच वेळेला कोणी विचारतो, 'माझे किती झाले', त्यावर वेळ न दवडता त्याला सांगितलेला त्याचा हिशोब, नव्या आलेल्या गिऱ्हाईकांचं स्वागत अशा वेगवेगळ्या स्तरावर हे लोक लीलया वावरत असतात. कुठल्याही भेळेच्या ठेल्यावर हे पहाणंदेखील आनंददायी असतं. ह्या सगळ्यापेक्षा कोणतंही दृश्य मनमोहक असूच शकत नाही. माणसाची पाचही इंद्रिय आपापल्या जाणिवा त्या भेळवाल्याच्या चरणी अर्पण करून ह्या मोहक घटनांचा आस्वाद घेत असतात. ह्या जाणिवा फक्त अनुभवता येऊ शकतात, त्या कोणत्याच शब्दात सांगता येऊ शकत नाहीत, किंवा त्याची नेमकी परतफेडही होऊ शकत नाही. ह्याच ईश्वरी तृप्तीची पावती; म्हणून आपण त्या भेळवाल्याला पैसे देतो. हे पैसे जसे त्याच्या कष्टाचे असतात, तसेच ह्या घटकांच्या आपापल्या गुणांचे आणि त्यांनी आपल्या पंचेंद्रियांना दिलेल्या अद्भुत तृप्तीचे असतात. ह्या भेळवाल्यांची किमया ही, की ते अगदी कोणत्याही जागी आपल्याला हेच समाधान देऊ शकतात. टेकडीवर, समुद्राकिनारी, पर्वतपायथा, रस्त्याच्या बाजूला, आडवाटेला, गावात, शहरात, टपरीवर, अगदी हॉटेलमध्येसुद्धा.





ही हॉटेलमधली भेळ मात्र फारच इंग्रजाळलेली असते. ही एकच जागा आहे, जिथे भेळ खण्याआधी तिच्या किंमतीकडे पाहिलं जातं आणि ती किंमत बघून ती घ्यावी का नाही असा संभ्रम निर्माण होतो. वास्तविक, 'भेळ' हा असा पदार्थ आहे, की जो घेताना किंमत न विचारता सरळ 'दोन भेळ करा', असं फर्मान सोडलं जातं. कमी पडली तर हक्कानी, आपल्या पाकिटाचं आपल्या पोटपूजेवर काय म्हणणं आहे, ह्याचा विचार न करता अजून मागवली जाते. 'पैसे नाहीत', म्हणून भेळ खाल्ली नाही, असं कधीच होत नाही. भेळ खायला लागते, ती केवळ इच्छा. 'मला आत्ता भेळ खायची आहे!' बस्स! हा एकच विचार पुरेसा असतो भेळ खायला जाण्यासाठी. मग 'घरी किती स्वयंपाक केलेला आहे?', 'आपल्याकडे तेवढे पैसे आहेत का?', 'आपण आजारी पडणार नाही ना?' हे आणि असे सगळे प्रश्न इतके गौण वाटायला लागतात, की ते कधी उपस्थितच झाले नव्हते, असं होऊन जातं आणि पावलं पोटाच्या पंढरीची वाट धरत आपोआप भेळवाल्याच्या गाडीकडे वळतात. ह्या भेळवाल्याकडे आपल्याला बघता येतं. तो कसा बनवतोय ह्याकडे लक्ष द्यायला नव्हे, तर प्रत्येक इंद्रियाला एक विलक्षण अनुभूती घेता यावी म्हणून. त्याच्यात आणि आपल्यामध्ये कोणताही आडपडदा नसतो. त्याच्या मुठीमधून ओसंडून वाहणारे कांदा-टोमॅटो, मुक्तहस्ते पडणारे दाणे, नजाकतीनं पडणारं पाणी; आणि हे सगळं टाकून झालं की जोरजोरात येणारा 'ठकठक' असा पातेल्याचा आवाज अन् भेळ कालवताना त्याच्या कपाळावर डवरलेला घाम. हे सगळं पाहिलं, की 'हाताची चव' आणि 'गळालेल्या घामाची चव' काय असते, ते लगेच कळून येतं. दिसायला कितीही कळकट दिसत असलं, तरी तशी चव हॉटेलमधल्या भेळेत काहीही केलं तरी येत नाही. कारण तिथे सगळ्यात मुख्य असतो, तो भेळवाला आणि गिऱ्हाईकांमध्ये असलेला आडपडदा, हॉटेलमध्ये असलेली स्वच्छता आणि टापटीपपणा. निगुतीनं, न सांडता, स्वछता पाळून केलेली भेळ ही चविष्ट कशी काय लागेल? त्यामध्ये हातचा घाम लागलेलाच नसतो. लागलेला असतो, तो स्वच्छतेचा डाग. अशा ह्या स्वच्छतेच्या डागामुळेच भेळेची किंमत आधी पाहिली जाते. सहाजिकच भेळेबाबत कधीही न केलेलं किंमत आणि गुणवत्तेचं समीकरण आपली सगळी गणितं कोलमडवून टाकतं.

मुळात भेळ, पाणीपुरी, रगडापुरी ह्या सगळ्या हॉटेलमध्ये खायच्या गोष्टीच नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त गाडीवरच खाव्या, अशा आहेत. त्यातही एखादी कळकट दिसणारी गाडी. हॉटेलमध्ये भेळ-पाणीपुरी खाल्ल्यावर साधी सुकी पुरी मागता येत नाही, ह्यावरूनच भेळप्रेमींना हॉटेलमध्ये भेळ खाण्याचा तिटकारा का असेल, ह्याची कल्पना येईल. मुळात, चाट प्रकारातला कुठलाही खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर सुक्या पुरीची मागणी करायलाच नाही लागली पाहिजे. जेव्हा ती केली जाते, तेव्हा एकतर गिऱ्हाईक तरी नवखं असतं नाहीतर भेळेची गाडी तिथे भेळ खाण्यायोग्यतेची तरी नसते. कारण, खाऊन झाल्यावर सुकी पुरी हातावर ठेवणं, हे पंचपक्क्वान्नांचं जेवण घेऊन उठल्यावर जशी भलीमोठी ढेकर येते, तसं आपसूक घडलं पाहिजे. कारण, दोन्ही घटनांमध्ये तृप्ततेची पावती त्याशिवाय मिळूच शकत नाही. छान मनसोक्त जेवल्यानंतर जेव्हा एक षड्जामधली ढेकर येते, तेव्हा माणूस स्वतःशीच छान हसतो. त्याचं सगळं समाधान त्या एका नादात सामावलेलं असतं. म्हणूनच बहुदा, एरवी अशा प्रकाराची कितीही किळस वाटत असली, तरी अशा जेवणानंतर आलेल्या ढेकरेला तुच्छतेचं नव्हे, तर मानाचं स्थान मिळालेलं आहे. अगदी तसंच चाट खाऊन घेतलेल्या पुरीला मानाचं स्थान मिळालंय. एका विशिष्ट लयीत खाल्ल्यानंतर सबंध समारंभ संपल्याची घोषणा करणारी ती एक भैरवी असते.


तसं बघायला गेलं, तर भेळ खाणं, हा एक समारंभच असतो. कदाचित असा एकमेव समारंभ, ज्याला विशिष्ट काळवेळ किंवा कोणताही मुहूर्त लागत नाही. केवळ आंतरिक इच्छा एवढं एकच कारण भेळ खायला पुरेसं असतं. पण, इच्छा झाली आणि कशीही भेळ खाल्ली, असं मात्र अजिबात चालत नाही. एखाद्या सोहळ्यासारखा थाट लागतो भेळ खायला. एखादा पदार्थ नाहीये, म्हणून तशीच, तो पदार्थ न घालता भेळ करू, असं म्हणून भेळ केली, तर ती कधीच चांगली लागत नाही. उलटपक्षी आपल्यालाच 'भेळेचा असा मौका घालवला', म्हणून पश्चात्ताप होत राहतो. तेव्हा भेळ करायची तर साग्रसंगीत, अथवा नाही. मग तसं औचित्य साधण्यासाठी कितीही थांबावं लागलं, तरीही चालेल. कांदा हा एकसारखा बारिक चिरलेला हवा, टोमॅटोही तसाच, कुठेही दबला न जाता चिरला पाहिजे, कोथिंबीर, मिरची ह्या साहित्य म्हणून काढल्या, तरी त्या छान सजवूनच ठेवल्या गेल्या पाहिजेत. बटाटा असाच वेडावाकडा पडलाय, असं अजिबात चालत नाही. तोसुद्धा व्यवस्थित उकडून त्याच्या एकसारख्या फोडी करून ठेवायला लागतं. कैरीचे बारीक तुकडे करताना तोंडाला कितीही पाणी सुटलं, तरी संयम ठेवून तिला वेगळ्या वाडग्यात काढावं लागतं. मधेच कैरीचे तुकडे खाणं, किंवा दाण्याची फक्की मारणं, ही असली कृत्य भयंकर अपराध समजला जातो. भेळ करताना सगळे पदार्थ शेवटी एकमेकांमध्ये मिसळून जाऊनच भेळेची चव वाढवतात. असं जरी असलं, तरी प्राथमिक तयारी करताना मात्र प्रत्येक पदार्थाला मानाचं, स्वतःच असं वेगळं स्थान दिलं गेलंच पाहिजे. एकत्रच करायचंय, असं म्हणून कांदा आणि कैरी एका वाडग्यात काढलेत, तर ताबडतोब दोघेही संप पुकारून आपापल्या चवींचे उमेदवार माघारी बोलावून तुमच्या भेळेचं सरकार उलथवतील. तेव्हा, प्रत्येकाला स्वतःचं मानाचं स्थान देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रत्येक वाडगा हा भेळ कालवायच्या पातेल्याच्या भवताली खाली घातलेल्या वर्तमानपत्रावर नीट मांडून ठेवावा लागतो. चुरमुरे, फरसाण ही मंडळी कडेला व्यवस्थित टेकवून ठेवली गेली पाहिजेत. ही सगळी तयारी करताना चिंचेच्या पाण्याला देवाच्या स्थानी ठेवून त्याची आराधना करायला हवी. हाताच्या तळव्यावर चिंचेच्या पाण्याचा डाव टेकवून, तळहातावर आलेल्या थेंबाला जेव्हा तोंडात टाकून जिभेवर रेंगाळवलं जातं आणि तोंडातून जेव्हा 'आहा' असा उद्गार येतो, तेव्हा हा देव तुमच्यावर प्रसन्न आहे, असं खुशाल समजावं. पाठोपाठ चिंचेच्या पाण्याला जीभ आणि टाळू ह्यांनी एकत्र केलेला घंटेसारखा 'टॉक' असा आवाज जणू सांगत असावा, "देवा! तू अगाध आहेस! माझी भेळ तारून ने!" मग हळूहळू हे रथीमहारथी मैदानात उतरत एकमेकांशी लगट करत एकमेकांचे सगळे गुण स्वतःच्या अंगी भिनवू लागतात. कैरीचा मिश्किल आंबटपणा, कांद्याचा करारी स्वभाव, सौम्य बटाटा, प्रेमळ टोमॅटो, चुरमुरे-फारसाणाची अतूट मैत्री आणि ह्या सगळ्यांची एकत्र मोट बांधून ठेवणारं, कर्त्या पुरुषांसारखं वाटणारं चिंचेचं पाणी! मग वरून शेव कोथिंबीर ही ह्या घरची लहान मुलं घराची गोडी, त्याचं घरपण अजूनच वाढवत असतात. ह्या सगळ्यांच्या आनंदात भर घालणारे दाणे हे व्यक्तिमत्त्व जवळच्या काका-मामांसारखं असतं. त्याच्या असण्यानं भेळेचा स्वाद अधिकच वाढतो आणि नसतील, तर सतत चुकचुकल्यासारखं होतं, 'असायला हवे होते', असं सतत वाटत रहातं. पण ह्या सगळ्यांची भट्टी एकदा जमली, की मग त्यासारखी तोड कशाला उरत नाही. असा हा सोहळा उत्तरोत्तर रंगतच जातो. घासागणिक 'व्वा! बढिया!' असे उद्गार निघतात आणि खाऊन झाल्यावरसुद्धा त्याच आठवणीत पुढचे कितीतरी दिवस रमायला होतं. ह्या सोहळ्यात आकंठ बुडाला नाही, असा माणूस क्वचितच दिसेल.

भेळ खातानासुद्धा एक वेगळा साज असतो, एक विशिष्ट पद्धत असते. स्वतःची अशी ह्या पदार्थाची एक लय असते. त्या लयीतच भेळ खाल्ली जाते. सावकाश, रवंथ करत खायचा हा पदार्थच नव्हे. एक घास तोंडात असेपर्यंत पुढचा ओठांपाशी येऊन ताटकळत उभा असलेला दिसतो. आणि त्याचा पुढचा घास हा आदला घास ओठांपाशी असतानाच आपल्याला ताटलीत दिसत असतो. इतक्या दूरचं नियोजन करायला लावणारासुद्धा हा एकमेव पदार्थ. चमचा तोंडात घालून, आतमध्ये घास ढकलून देऊन तो रवंथ करत खाल्ल्यानंतर मग ताटलीमध्ये पुढच्या घासाची तजवीज करत चमच्याने ताटलीतल्या जिन्नसाला ढोसण्याची प्रथा ह्या पदार्थात नाही. एका वेळी तीन घास तयार ठेवावे लागतात. ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान तिखट लागलंय, जीभ चावली गेलीये, अशा लंगड्या कारणांना काहीही जागा नसते. कितीही तिखट लागलं, अन तोंडचं पाणी जाऊन डोळ्यात आलं, तरीही खाणारा शेवटचा घास खाऊन ताटली चाटूनपुसून होईपर्यंत थांबायचं नाव घेत नाही. बाजी-मुरारबाजी अशा लढवय्यांना स्मरून भेळ खायची असते. महाराज गडामध्ये जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत थांबायचं नाही. स्वतःला झालेल्या जखमा बघायला तर फुरसतच नसते. एकदा का राजे गडामध्ये सुखरूप गेले, की मग डोळ्यातलं पाणी, चावली गेलेली जीभ, तिखट लागल्यामुळे हवा खाण्यासाठी तोंडाबाहेर फेरफटका मारणारी जीभ, तिखट खाऊन कपाळावर डवरलेला घाम ह्या सगळ्यांची जाणीव व्हायला लागते. पण, जाणीव होऊन त्रास होत असला, तरी आपलं ध्येय आपण गाठलं, ह्यातच समाधान असतं. म्हणूनच, अट्टल भेळपटू तिखट लागल्याची तक्रार कधीही करत नाही. एखाद्या चायनीज ड्रॅगनप्रमाणे तोंडाने हवा बाहेर टाकत टाकत पुढचा घास तोंडात टाकला जातो. हीच ती भेळ खायची लय. ही लय द्रुत होऊनही चालत नाही किंवा विलंबित होऊनही चालत नाही. खायला सुरू केल्यापासून ते संपेपर्यंत एकच लय असते. ठेल्यावर खाताना ही लय सांभाळण्याबरोबरच आपली नजरही इकडेतिकडे फिरवायची असते. एखाद्या पत्रकाकडे, दुकानाच्या पाटीकडे भेळवाल्याच्या गाडीकडे, असं कुठेतरी एकटक बघत भेळ कधीही खाल्ली जात नाही. येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकांकडे, आजूबाजूच्या वर्दळीकडे, येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या बघतबघत ह्या भेळेची चव वाढवायची असते. चालणाऱ्या माणसांकडे बघतबघत भेळेचा एकेक घास तोंडात टाकायचा असतो. तो घासही अशा पद्धतीनं तोंडात ढकलायचा असतो, की ते बघून त्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटावं. हे असं खाताना बघून मोह होऊ नये, म्हणून लोकं भेळेच्या गाडीजवळून जाताना आपापल्या माना खाली घालून जाताना दिसतात. ज्यांना हा मोह टाळणं अगदीच अशक्य होतं, ते गाडीसमोर अगदी असहाय्यपणे थांबतात. मोठ्या मुश्किलीने स्वतःला थांबवायचा फोल प्रयत्न करत गाडीपाशी येतात. अजिबात ध्यानीमनी नसताना, केवळ एखाद्या माणसाला खाताना बघून अशी अनावर इच्छा होणं आणि म्हणून आपण खातोय, ही असहाय्य आणि अपराधीपणाची भावना मनात ठेवून मग ही लोकं हळूच आपली एक भेळ सांगतात आणि मग केलेलं पाप बाधू नये; म्हणून अजून तीन भेळ बांधून घेतात. हा एक सारा वेगळाच साज आहे. तो शेवटची सुकी पुरी खाल्ल्यानंतर संपतो. ही पुरी खाऊन जेव्हा आपला तृप्त आत्मा 'किती झाले?' ते विचारतो, तेव्हा तो भेळवाला भरून पावलेला असतो.


अशा ह्या भेळेच्या गाडीवर पैशांसाठी झालेला वाद क्वचितच दिसेल. चाळीसच्या भेळेला फारातफार शंभर रुपये काढून दिले जातात. पाचशे रुपये द्यायचा अतिशहाणपणा कोणीही करत नाही. तसंच, सुट्टे नसल्याचा दावा करणारे आणि त्यावरून हटून बसणारे भेळवालेपण अगदीच नसल्यासारखे आहेत. अगदीच सुट्टे नसतील, तर 'आणून देतो हां सायेब', असं म्हणत तो लगेच त्याची तजवीज करताना दिसतो. असा हा भेळवाला खरोखरी विठ्ठलापेक्षा जास्त दुवा घेऊन जात असावा. वारीला तल्लीन होऊन भजनं गात, टाळ-चिपळ्यांच्या गजरात हरिनामात दंग होऊन चिंब भिजणारे वारकरी असोत; किंवा भेळेपायी आपल्यावर असलेली बंधनं झुगारून देऊन भेळेच्या गाडीवर कितीही मोठी रांग असली, तरीही त्यामध्ये भेळरूपी दैवताच्या दर्शनासाठी तासंतास उभं रहायची तयारी असणारे भेळकरी असोत, दोघांचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे ईश्वराचा सहवास अनुभवणं. एक तो गाऊन अनुभवतो, तर एक खाऊन. दोघांचं ध्येय हे हृदयापाशीच असतं. फरक इतकाच, एकाचा मार्ग ओठातून जातो, तर एकाचा पोटातून. थोडक्यात काय, हा भेळकरी पंथ अगदी तल्लीन होऊन त्याच्या दैवताच्या आराधनेत गुंग झालेला असतो; इतका की, भेळकऱ्यांना बघूनसुद्धा इतर लोकांना आपोआप आनंद होतो. त्यांची भेळेची भक्ती पाहून, आपणही त्यांना सामील व्हावं, असं वाटायला लागतं. असेच एकेक-दोनदोन लोकं जोडत हा भेळकरी पंथ आनंद वाटत आहे आणि अशा ह्या भेळकरी पंथाचा एक सच्चा पाईक आणि सच्चा प्रसारक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे!



By Amey Sachin Joag




5 views0 comments

Recent Posts

See All

The Hypocritic Hue

By Khushi Roy Everything is fair in love and war, in passion and aggression. Because every lover is a warrior and every warrior a lover. Let it be, the vulnerability of a warrior or the violence of a

Stree Asmaanta

By Priyanka Gupta असमानता नहीं महिलाओं की पुरुषों पर निर्भरता वास्तविक दुर्भाग्य है महिला और पुरुष के मध्य भेद प्रकृति प्रदत्त है,लेकिन भेदभाव समाज की देन है।किसी एक लिंग को दूसरे पर वरीयता देना और लि

bottom of page