पंकज भैय्या
top of page

पंकज भैय्या

By Amey Kshirsagar



सकाळी निवांत उठलो तो आमच्या पंकज भैय्यांच्या फोननी.. "घ्यायला येतोय तुला, लोकेशन पाठव आणि तयार हो" अशी नेहमीच्या पद्धतीनं ऑर्डर आली..

पंकज भैय्यांची माझी ओळख बॅडमिंटन कोर्टवर झालेली.. माझ्यापेक्षा वयाने दहाएक वर्षं मोठे.. कायम टापटीप, HDFC बँकेत डेप्युटी VP आहेत.. आमच्या बॅडमिंटन ग्रुपचा फेविकॉल.. सगळ्यांना हक्कानं शिव्या घालत, "पार्टीको जाना है, तेरेको आना पडेगा.. नही आया तो बिल तेरेसे भरवाऊंगा" अशी प्रेमळ धमकी देत स्वतःच्या हजरजबाबीपणाला स्वतःच हसून दाद देत लहान मोठ्या सगळ्यांना एकत्र आणणारा हा आमचा मोठा भाऊ.. कुठल्याही गप्पांच्या ओघात विषय निघाला तर तीन चार वर्षांपूर्वी केव्हातरी काढलेला एखादा फोटो चटकन मिनिटभरा मध्ये काढून दाखवतो.. त्यांच्या मोबाइल मध्ये सगळे फोटो त्यांनी ठेवलेले असतात..





काल हॉटेलचा एवढा मजेशीर अनुभव आला होता, तेव्हा हॉटेल बदललेलं बरं असा विचार करून RSVP नागपूर, ला आलो आणि पंकज भैया घ्यायला आले.. साधारण 8 महिन्यांनी "so happy to see you here maaan.." म्हणत त्यांनी कडकडून मिठी मारली.. मिलिंदनं दिलेलं "भडंग" आणि मी आणलेल्या "कलाकंद"ची पिशवी हातात सोपवली तर,"तू छोटा है मेरेसे..तेरेको ऐसा नही लाना रेहता", वगैरे दरडावून झालं.. इथून पुढे आमची नागपूर दर्शनाला सुरुवात झाली..गप्पांच्या ओघात ज्या ज्या गोष्टीचा मी किंवा मेघा रमा नी जिक्र केला त्या बहुतेक सगळ्या जागांवर त्यांनी आम्हाला फेरफटका करवून आणला.. पंकज भैयानी आम्हाला "जोग प्लेटेड" नावाच्या हॉटेल मध्ये नेलं. "नागपुरी सावजी", "पाटवडीची भाजी","नागपुरी झुणका", "पातळ भाजी" आणि "भाकरी" अशी भक्कम ऑर्डर केली. उन्हाळ्यात ताक घ्यावं म्हणून ते प्यायला लावलं. नंतर तिथली फेमस पुरणपोळी तूप खाऊन निघालो ते नागपुरच्या यशवंत स्टेडियमला पोचलो..शिकंजी प्यायला..


मी नैनिताल ला शिकंजीचं सरबत प्यायलो होतो.. इडलिंबू सारखं..पण ही नागपुरी शिकंजी म्हणजे फालुदाची बहीण.. भरपूर मलई, दूध आणि घासागणिक आलेला सुकामेवा..

आता आपण पान खाऊ म्हणजे खाल्लेलं पचेल. संध्याकाळी दुसरीकडे जायचं आहे ना, असं पंकज भैया म्हणून हॉटेल सेन्टर पॉईंट च्या शेजारच्या फेमस पान वाल्याकडे घेऊन गेले..तोंडात पान ठेवताच विरघळणाऱ्या पानामुळे पचनशक्ती खरच कार्यरत झाली..

तिथून मग नवसाला पावणाऱ्या "टेकडी गणपती"च्या दर्शनाला गेलो. लगेच पंकज भैया पुढे गेले आणि तिथल्या गुरुजींना सांगितलं,"भाई और बहू आये है, just married है" मग गुरूजींनीही लगेच मेघाच्या पदरात नारळ-ओटी आशीर्वाद दिले..

तिथून शुक्रवारी तलाव.. या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भल्यामोठ्या तलावाचं खोलीकरणाचं काम सुरू आहे. ते पंकजभैयाना उंचावरून आम्हाला दाखवायचं होतं..! तर हे बिधास्तपणे समोर असलेल्या, "टाटा पारसी गर्ल्स कॉलेज"मध्ये घुसले.. मग "वॉचमन","क्लार्क"आणि पुढे "प्राचार्यांना" पटवून आम्ही त्याच्या गच्चीवर गेलो, ते प्रचंडमोठं काम बघितलं..थोडं फोटो सेशन झालं.. पंकज भैय्यांचं नागपूरवरच प्रेम ते शहराविषयी भरभरून बोलत असताना सातत्याने जाणवत होतं.

तिथून मग फुटाळा तलावकडे प्रयाण केलं.हा अजून फेमस पिकनिक स्पॉट. याचं वैशिष्ट्य म्हणजे एक खरं हेलिकॉप्टर कुणालाही न कळत रात्रीतून आणून सुशोभीकरण म्हणून ठेवलं आहे..

तिथून भैय्यांच्या घरी भाभी, काकू, अनिश, भैय्यांच्या मावशी वगैरे याना भेटायला गेलो..


प्रचंड लोकसंग्रह आणि आदरातिथ्य त्यांना आणि सोनिया भाभी दोघांनाही लागतं.. हे सगळं काकूंकडून(त्यांच्या मातोश्री) आलं आहे हे परवा मला अगदीच जाणवलं..

या लोकांचा आग्रह हा साधारण माझ्या सासूबाई किंवा सांगलीच्या खरे मंगल कार्यालयातल्या राजू अभ्यंकरांसारखा.. असल्या लोकांसमोर कसलाही युक्तिवाद चालत नाही, गुमान खात राहणं हाच एकमेव उपाय..

आग्रह कर करून जेवायला घालून ice cream आणि पानाची मेजवानी झाल्यावर, "आता सोडून ये त्यांना..नागपूरमध्ये नवीन आहेत आणि लहान आहेत अजून", अशी ऑर्डर काकूंनी दिली..

"मी कॅब बुक करतो" म्हणलो तर,"मम्मीला सांग ते" असं म्हणत गाडीकडे भैया निघाले सुद्धा..आम्ही गाडीत बसतोय तर काकू आल्या आणि म्हणाल्या,"लीची देऊ का रे, या इथे चांगली मिळते". मी शेवटी,"नाही खाणं होणार काकू",असं म्हणून त्यांचा निरोप घेऊन निघालो..


बरं हॉटेलवर सरळ यावं तर ते नाही, 'सकाळी तू लग्नाला निघाला आहेस ते किती लांब आहे ते आत्ताच बघून येऊ' म्हणून तसेच आम्हाला पुढे घेऊन गेले.. सरतेशेवटी आम्हाला हॉटेल ला सोडून,"उद्या येऊ का जायचं का अजून कुठं", वगैरे विचारुन रात्री जरी काही वाटलं तर मी आहेच हे सांगून झालं..

-




By Amey Kshirsagar





48 views3 comments

Recent Posts

See All

He Said, He Said

By Vishnu J Inspector Raghav Soliah paced briskly around the room, the subtle aroma of his Marlboro trailing behind him. The police station was buzzing with activity, with his colleagues running aroun

Jurm Aur Jurmana

By Chirag उस्मान-लंगड़े ने बिल्डिंग के बेसमेंट में गाडी पार्क की ही थी कि अचानक किसी के कराहने ने की एक आवाज़ आईI आवाज़ सुनते ही उस्मान-लंगड़े का गुनगुनाना ऐसे बंध हो गया मानो किसी ने रिमोट-कंट्रोल पर म्य

bottom of page