- hashtagkalakar
कर्ण
By Shital Rahul Dusane
जन्म श्राप बनूनी गेला , सोसले घाव हीन शब्दांचे
एका सूर्यपुत्राच्या नशिबी आले, जीणे सूतपुत्राचे
जन्म माझा, लाजीरवाणा वाटला होता तिला,
नऊ मास उदरी पोसूनी, मग गंगेत सोडीले तिने
राधेच्या दुधावर वाढलो मी, अधीपती ने छत्र दिले
शौना सोबत खेळलो मी, तरीही होते काही उणे
परशुराम गुरु माझे,ब्रम्हास्त्र त्यांनीच भेट दिले
खोट्या माझ्याच बोलण्याने, भेटीला ही श्राप मिळे
द्रौपदी ही हसली होती मजला, सूतपुत्र म्हणुनी नाकारले
मान्य,तो गुन्हाच माझा, शुंभ बनूनी मी ,वस्त्रहरण पाहिले
मानतो मैत्रीत दुर्योधनाच्या, मी कितीदा वाहत गेलो
भूल हीच,मतलबी नात्यांपुढे,सदा मैत्री निवडत गेलो
मतलबीच ती नाती होती, त्यांना खरे कसे म्हणावे
केशवाने सांगता तिजला, कुंतीत ममत्व जागावे
पाच त्या पांडवांचा,मी श्रेष्ठ भ्राता होतो,
दानशूर तरी नींदनीय, पार्थाहुनी शूरवीर होतो
इंद्राने छळ केला, दानात कवच कुंडले गेली
कृष्णाने सारथी बनूनी,ही सारी माया केली
रणांगणी त्या युद्ध चालले, युद्ध नियम सारे तुटले
निःशस्त्र होतो तेव्हा,अंजलीकाने कंठात प्राण घेतले
दानवीर कर्ण म्हणुनी , सदा वचनात बांधला गेलो
कुरुक्षेत्री प्राण जाता, साऱ्या श्रापांतून मोकळा झालो
By Shital Rahul Dusane