By Mrs. Ritu Patil Dike
आनंदला जाऊन आठ महिने झालेत. आज त्याचा वाढदिवस, प्रभाकाकूंन त्याची खूप आठवण येत होती. खरंतर आनंद गेल्यापासून असा एकही क्षण गेला नव्हता की त्यांना त्याची आठवण झाली नाही पण वाढदिवसाच्या दिवशी अतिशय प्रखरतेने त्यांना त्याची कमतरता जाणवत होती, तो नसल्यामुळे त्यांच्या आणि दिनू काकांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी त्यांना जाणवत होती. खिडकीतून बाहेर बघत काकू विचार करत होत्या," खरंच माझा आनंद सर्वांना आनंद वाटण्यासाठी जन्माला आला होता जणु, सतत त्याला इतरांची काळजी. मित्रांची, आई-वडिलांची, बहिणीची, इतकच काय पण आश्रमातल्या अनाथ मुलांची, आजी-आजोबांची. दरवर्षी न चुकता वाढदिवसाच्या दिवशी अनाथाश्रमातील मुलांना कपडे आणि खाऊ घेऊन जायचा. किती ओरडायचे मी त्याला.
"उधळा आहेस नुसता. कशाला एवढं करायचं? काही गरज नाही. त्यापेक्षा शंभर रुपये दानपेटी टाकत जा मंदिराच्या" मी त्याला म्हणायचे.
मागच्या वर्षी स्वतः आजारी होता पण मित्रांच्या हातून अनाथाश्रमातील मुलांसाठी त्याने कपडे आणि खाऊ पाठवला. मला फार आश्चर्य वाटत होतं त्याचं, एवढ्या आजारपणातही कसं काय या मुलाला हे सुचतं म्हणून कौतुकही वाटत होतं, तरीही मी त्याला रागावले , "अरे तब्येत बरी नाही तर आराम कर ना जरा. कशाला ह्याला फोन ,त्याला फोन, हे ऑर्डर करू दे, ते ऑर्डर करू दे. जरा निवांतता म्हणून नाही आणि कशासाठी तर आश्रमातल्या मुलांसाठी."
" मला बरं वाटतंय गं आई" एवढंच काय त्यावर त्याचं उत्तर.
असं कधी झालं नाही का कुणाला गरज आहे आणि आनंद तेथे हजर नाही. दिवसभर ऑफिस करून रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावायला त्याने कधीच कंटाळा केला नाही. मागे रस्त्यावरचं जखमी कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन आला, त्याच्या जखमेला मलमपट्टी करू दे , त्याला कापसाच्या बोळ्याने दूध पाजू दे ,काय काय नाही केलं , कामवाल्या लक्ष्मीची मुलगी अभ्यासात हुशार पण परिस्थितीमुळे शिक्षण सोडायची पाळी आली तर ह्यालाच काळजी, शाळेत फीचे पैसे भरले आणि तिचं शिक्षण परत सुरु केलं. शेजारच्या काळे काकांना डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावर दिसेना तेव्हा त्यांनाही हवी ती सारी मदत केली आणि हे सारं तो कुठल्याही अपेक्षेविना करायचा.
मी त्याला आपलं चारचौघींसारखं सांगायचे , "असा कसा रे तू? अशानं लोक तुझा फायदा घेतील." पण यावर तो नुसता हसायचा, त्यांने कधीच माझं ऐकलं नाही पण मला त्याची खंतही नाही. वाटला तर आज त्याचा अभिमानच वाटतो. माझी कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून तो मला लाभला आणि कुठलं पाप म्हणून नियतीनं माझा आनंद कायमचा माझ्यापासून हिरावून घेतला? कितीही विचार केला तरी ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. काकूंच्या डोळ्यात आसवं गोळा झाली.
तोच खांद्यावर त्यांना हाताचा स्पर्श झाला. वळून बघतात तर दिनू काका होते .
"प्रभा आज आनंदचा वाढदिवस, चलतेस ना? आश्रमात जायचंय." काका भरल्या आवाजात बोलत होते . काकांच्या हातात दोन पिशव्या होत्या एकीत कपडे आणि एकीत खाऊ होता . काकू लगेच उठल्या डोळ्यातील आसवं पुसत म्हणाल्या , " हो हो जायचंय तर".
By Mrs. Ritu Patil Dike
Comments