- hashtagkalakar
कवी
By Ameya Sunildatta Bal
जे क्षितिज तुम्हास दिसते
तो त्यापल्याड राहतो
अवकाश पांघरूनी तो
भूगर्भात निजतो
मणक्यांची जपमाळ हाती
आत्मा कमंडलू होतो
साक्षात अमूर्त गंधार
त्याच्या हूंकारातून सजतो
संवेदनांचे मृगजिन
पसरूनी ध्यानस्थ होतो
सृजनाच्या भावाबळाने
नवसृष्टी साकार करतो
जे जडास करते चेतन
ते अग्निहोत्र चेतवतो
स्व - सृजनाच्या समिधांनी
ते अखंड फुलवीत राहतो
तो किती जन्मांचा योगी
त्रीलोकात विहार करतो
रवी शशी सोबती त्याचे
अन् गीत संजीवन गातो
अवकाशाच्या घुमटातून
नाद निरंतर येतो
त्या नादाच्या उगमाशी
हा बैरागी असतो
कधी अखंड संचारत राहतो
कधी समधिस्त होतो
हातात घेवून चिमटा
कवी अलख निरंजन गातो
कवी अलख निरंजन गातो
By Ameya Sunildatta Bal