By Amol Kharat
तु स्थिर ….आणि तुझ्या डोक्यावर अस्थिर ढगांच्या सावलीचं जरा वेळ स्थिरावणं…. आणि तुझ्या डोक्यावरच स्थिर झाडांच्या सावलीचं अस्थिर राहणं... या भाबड्या ढगांना….या भाबड्या झाडांना…..आणि त्यांच्या भाबड्या सावल्यांना का तुला थंड करावस वाटतय…? तुझ्या जन्माचा इतिहास कोणीतरी सांगितलाय वाटतं त्यांना… आणि हे सगळं तुला सुखद असेल ना ...त्यांचं तुझ्यासाठी राबणं…. तुझ्या आत घुसून परत डोक्यावर पसरणं….अन तुझ्या पासून दूर राहून तुझ्यावरच मिरवणं...यांच्यासाठीच तु पावसाचा उत्सव स्वतःच्या अंगावर भरवतो का..? किती भारी असतो तो उत्सव...सगळं आभाळ बिलगत असतं तुला….अन त्या झाडांचं प्रत्येक पानही स्वाधीन होत असतं त्या सोहळ्यात…. ओला आणि चिंब असतो प्रत्येक कण न कण...
सूर्यही लपुन बघत असतो आणि इंद्रधनू छापत असतो….मला तर वाटतं ते झाडंच त्यांच्या मुळ्यांतुन हा विचार तुझ्यात रुजवत असतील...कारण त्यांच्याच रंगात तु अख्खा रंगत असतो त्या उत्सवात…..आणि वाराही घेत असतो आभाळाचा रंग...आणि वाटत फिरतो तुझ्या डोक्यावरील झाडांच्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्या जमिनीवर….आणि हा वेडा वारा इतकं सगळं वाटत सुटतो कि तुला हा उत्सवचं आटपून घ्यावा लागतो . खरच वेडा वारा ...यानेच बहुतेक तुझ्या जन्माचा इतिहास सगळ्यांना सांगुन टाकलाय….बरंच केलं त्याने हे….तु तापुन ..जळुन…..आणि जळतच जमिन फाडून त्याच जमिनीवर स्वतःला पसरवून सगळी आग पचवलीस तु….शांत झालास…. थंड झालास... आणि स्थिर झालास…. सुंदर झालास….का नाही सांगावं त्याने …? तोही पोळालाच होता तु बनताना….आणि तुला वडिलच आहे तो...वेडा वारा….वेड्यासारखाच उधळत असतो सगळीकडं….अनुभवाचे काळ आणि अस्थिरपण जाळत…..अन स्थिरत्वावर ऊर्जा माळत……
By Amol Kharat
Comments