By Mrs. Ritu Patil Dike
"ही मंदा म्हणजे ना मुलखाची वेंधळी. हिला पाहुणे मंडळींना चहा दे म्हणून सांगितलं तर कोण जाणे कुठे गप्पा मारत बसली आहे" म्हणत उषा काकूंनी तावातावात ट्रे उचलला आणि पाहुण्यांच्या खोलीत जायला वळल्या तोच मंदा आत्या आली.
"द्या ना वहिनी, मी नेते चहा"
" एवढा वेळ कुठे बसली होतीस? केव्हापासून तुला आवाज देत होते."
" अहो वहिनी त्या नीताच्या मुलाचं ना पोट केव्हापासून दुखत होतं म्हणून जरा..." पुढे काही बोलणार तोच उषा काकू म्हणाल्या, "त्याचं पोट दुखत होतं आणि तू मोठी एमबीबीएस डॉक्टरच की. जा तो चहा घेऊन थंड होईल नाहीतर" मंदा आत्या सवयीप्रमाणे हसली आणि चहाचा ट्रे घेऊन निमुटपणे निघून गेली.
मंदा आत्या म्हणजे उषा काकूंची धाकटी नणंद, तिचं लग्न झालं आणि वर्षाच्या आत नवरा गेला, मुलंबाळं नाही, सासरच्यांनी थारा दिला नाही, त्यामुळे तिचं सारं आयुष्य माहेरीच गेलं. खायला अन्न, ल्यायला कपडे मिळालेत पण तिच्या केविलवाण्या परिस्थितीमुळे तिला साऱ्यांच्या कामात पडूनही आदर केव्हाही मिळाला नाही. उषा काकूंची मुलगी नेहा हिचं दोन दिवसांनी लग्न होतं. उषा काकूंपेक्षा मंदा आत्याच कुणाला काय हवं नको ते सारं बघत होती. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि ती आयत्यावेळी कोणाला आणून द्यायची हे सारं तिला माहीत होतं. ती होती म्हणून सारे निर्धास्त होते. दारात रांगोळी काढण्यापासून, ते भटजींपर्यंत सारं ती बघत होती. पण जरा कुठे चुकली तर चारचौघात तिला घालून पाडून बोलण्याची एकही संधी उषा काकू सोडत नव्हत्या. पण मंदाआत्या कधीही त्यांना उलट उत्तर देत नसे. त्यांनाच काय पण ती कधीच कुणालाही उलटून बोलत नसे. घरात कोणालाही चिडचिड झाली तर ती काढायला एकमेव माणूस म्हणजे मंदाआत्या.
नेहाला मात्र हे कधीही आवडलं नाही. आईच्या अशा स्वभावामुळे ती तिलाही काही बोलू शकत नव्हती, आणि मंदाआत्यावरचं प्रेम उघडपणे कधी व्यक्तही करू शकत नव्हती. आताही आई मंदाआत्याला बोलली हे तिला आवडलं नाही, त्यामुळे तिला आईचा फार राग आला होता. दिवसभर तिने मंदाआत्याला गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ती कामात एवढी व्यस्त होती का तिला पाणी प्यायलाही उसंत मिळत नव्हती. शेवटी संध्याकाळी मंदाआत्या जेवणाचं ताट घेऊन नेहाच्या खोलीत आली नेहा मनोमन खुश झाली.
" घे गं बाळा, गरम आहे तोवर जेवून घे आणि काही लागलं तर मला आवाज दे" म्हणत आत्या जायला निघाली, तोच नेहाने हाक मारली,
" मंदाआत्या"
"काय गं बाळा?"
" बस ना गं दोन मिनिटं माझ्याजवळ."
" मी? मला जरा बाहेर काम आहे अगं"
" काही नाही होत एखादं काम कमी केलं म्हणून, ये तू माझ्याजवळ. मी सांगेन आईला."
आत्या सावरून बसली, नेहा बोलू लागली
" आत्या लहानपणापासून बघत आले, साऱ्यांचं किती करतेस, कुणाचं दुःख असो कुणाकडचा आनंदाचा प्रसंग असो कधीच मागे नसतेस आणि या साऱ्याच्या बदल्यात कुणी तुझ्याशी साधं प्रेमाने बोलतही नाही. पण तू कधीच कुणाचा राग मानून घेत नाहीस. सतत हसत असतेस. तुला वाईट नाही का गं वाटत? कुठल्या मातीची बनली आहेस तू?"
नेहाचं हे बोलणं आत्याला त्या क्षणी अनपेक्षित पण तरीही खरं होतं. आत्या पुन्हा हसली, ती म्हणाली,
"बाळा तुला हे वाटलं यातच सारं आलं.मी तर माझ्याबद्दल कोणी एवढा विचार करावा ही सुद्धा अपेक्षा कुणाकडून ठेवली नाही. खरंतर ज्या दिवशी सासरच्यांनी घराबाहेर काढलं आणि मी माहेरी आले त्या दिवशीच मी मनाने मुकी झाले, मनाने आंधळी झाले, बहिरी झाले कारण गरज माझी होती, आणि गरजवंताला अक्कल नसते तसं त्याला मनही असुन चालत नाही. या साऱ्याचा विचार करुन जगु शकले नसते. असो तुही फार विचार नको करूस. येते मी"
आत्याच्या ह्या उत्तराने नेहा स्तब्ध झाली होती. मंदाआत्या उठली, आत्याने नेहाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि जायला निघाली. नेहाने आत्याचा हात धरला आणि पुन्हा तिला जवळ बसवलं. पिशवीतून एक सुंदर पैठणी काढून तिच्या हातात ठेवली आणि म्हणाली,
"आत्या, तुझं म्हणणं कदाचित तुझ्या दृष्टीने बरोबर असेल, पण तू माझी लाडकी आत्या आहेस आणि तुझ्या बाबतीत कोणी असं वागलेलं मला कधीच आवडलं नाही, आवडणारही नाही. ही पैठणी मी स्वतः आणलीय तुझ्यासाठी. माझ्या लग्नात नेसशील? मला फार फार बरं वाटेन." मंदाआत्या नेहाकडे बघतच राहीली, दोघींचे डोळे पाणावले होते.
By Mrs. Ritu Patil Dike
Commenti