By Mrs. Ritu Patil Dike
सुलभा काकू सायंकाळी अंगणातील पाळण्यात झोका घेत बसल्या होत्या. आज सुलभाकाकूंच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस होता. काका नेहमीप्रमाणे इव्हिनिंग वॉक घेऊन परत आले, फाटकातून त्यांना काकू दिसल्या ते हसले आणि घरात न जाता तेही काकूंच्या शेजारी येऊन बसले. "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का?" काका हसत म्हणाले.
" अच्छा, लक्षात राहीलं तर तुमच्या?" काकूंनीही हसत विचारलं .
"म्हणजे काय? नुसतं लक्षातच नाही तर तुझ्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय" म्हणत काकांनी खिशातून एक पुडी काढली आणि ती काकूंच्या हाती ठेवली. काकूंनी पुडी उघडली आणि ते दोघंही दिलखुलास हसले. त्या पुडीत काकूंच्या आवडीच्या बोरकुटाच्या गोळ्या होत्या. काकांनी आपल्या हाताने एक गोळी काकूंना भरवली आणि काकूंनी काकांना.
"थँक्यू बरं का? आयुष्यात मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे पळून दमलो, आनंद मिळाला पण आजच्या या क्षणाच्या या छोट्याशा आनंदाची सर कशालाच नाही."
" अगदी खरं बोललीस आपल्या दोघांच्याही नोकऱ्या, प्रमोशन्स, घर ,गाडी सारं कमावता कमावता असे छोटे छोटे आनंदाचे क्षण जगायचे राहूनच गेलेत गं."
"एक बोलू? रागावणार नसाल तर"
" बिशाद आहे माझी? बोल बोल." काका हसत म्हणाले.
"मस्करी नका हो करू. आयुष्यात खूप यश मिळवलं पण आई-बाबा होण्याच्या बाबतीत मात्र.." काकूंचे डोळे पानावले.
" अगं एवढ्या छान वेळेला डोळ्यात पाणी कशाला आणतेस?"
" बोलू द्या हो मला. नाहीतर ही सल कायम राहिल मनात. प्रमोशन घ्यायचं होतं मला, प्रमोशन घेतलं तर मुंबईला एकटीने जावं लागणार होतं, बाळ असलं तर हे सारं शक्य होणार नव्हतं म्हणून दोन महिन्यांची गरोदर असलेली मी डॉक्टरांकडे जाऊन मोकळी होऊन आले. वाटलं होतं आपण स्थिरस्थावर झालो की होऊ देईन मूल. पुढे ऑफिसमधला घोटाळा समोर आला, इन्क्वायरी सुरू झाली, माझी चूक नसतानाही माझी नोकरी गेली आणि बाळाचं सुखही देवाने कधी पदरात टाकलंच नाही. मी आई होऊ शकले नाही. कधीकधी वाटतं माझ्या गुन्ह्याची देवाने मला शिक्षा दिली आणि माझ्याबरोबर तुम्हालाही." आणि काकु रडू लागल्या.
"अगं ती काही सर्वस्वी तुझी चूक नव्हती. तो आपण दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता आणि बाळ येण्याने माझ्यापेक्षाही जास्त तुझं आयुष्य बदलून जाणार होतं, त्यामुळे तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार तुला होता."
" मला अजूनही आठवतं आपल्या दोघांचा निर्णय आहे हे माहीत असून सुद्धा आपण जेव्हा डॉक्टरांकडून आलो तेव्हा आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर चिडली होती. त्यानंतर तिच्या आयुष्यात तिने तुला मानाचं स्थानही कधीच परत दिलं नाही. पण जेव्हा ती आजारी पडली तेव्हा तू आईच्या मायेने तिची सेवा केलीस. तू खरंच तिची आई झाली होतीस. शेवटच्या क्षणी का होईना तिने प्रेमाने तुझ्या डोक्यावरून हात फिरवला. तुझ्या तिच्या प्रतीच्या त्या निरपेक्ष प्रेमासाठी मी कधीच तुझा उतराई होऊ शकत नाही. आपल्याला मूल होऊ शकलं नाही याचं दुःख मलाही आहेच पण तू आई होऊ शकली नाही हे मात्र खोटं आहे हा सुलभा. तुझ्यातली प्रेमळ आई मी बघितली आहे."
काकुंच्या डोळ्यात पुन्हा अश्रू गोळा झाले, काकांच्या खांद्यावर डोकं ठेवून काकूंनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
By Mrs. Ritu Patil Dike
Comments