By Mrs. Ritu Patil Dike
ऑफिस आटोपल्यावर विद्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. रोज अगदी वेळेत येणाऱ्या गाडीला आज उशीर का झाला असावा हा विचार करत ती कधी घड्याळाकडे तर कधी रस्त्याकडे बघत होती. एवढ्यात थोड्या अंतरावरून तिच्या कानी एक संभाषण पडलं, एक बाई फोनवर कुणाशी तरी बोलत होती ,
"आय टेल यु, सोशल वर्क फार कठीण झालय गं हल्ली. घरात कामवाली आहे गं पण तिला सगळं सांगावं तर लागतच ना. आज तर मी चक्क माझा आणि माझ्या मिस्टरांचा शॉपिंगचा प्लॅन कॅन्सल करून आले त्या आश्रमातल्या मुलांना कपड्यांचं वाटप करायला आफ्टर ऑल आपणही या सोसायटीचं काहीतरी देणं लागतोच ना. मागल्या वर्षी बायकांचा हा क्लब जॉईन केल्यापासून सपाटाच लावलाय मी मुळी सोशल वर्क चा आणि माझ्या कामाला अक्नॉलेजमेंटपण एवढं मिळते म्हणून सांगू परवाच्या पेपर मधला फोटो बघितलास का ? नाही कसं ? अगं तालुका स्पेशल पेज वरती बातमी होती ती. चांगली पैसे दिले होते बातमी छापून आणण्याकरिता. हो हो थँक्यू." विद्याला ते सारं बोलणं ऐकून मोठी गंमत वाटत होती.
आतापर्यंत ते संभाषण सहज तिच्या कानी पडत होतं पण आता बस येईतोवर काहीतरी विरंगुळा म्हणून ती कान देऊन ऐकायला लागली. विद्या गालातल्या गालात हसत होती आणि ती बाई बोलतच होती ,
"म्हणजे काय चांगला हजार रुपयांचा चेक घेऊन गेले होते मी त्या स्लम मधल्या मुलांना खाऊ म्हणून देण्याकरिता पण ह्या लोकांचं साधं बँक अकाउंट सुद्धा नाही एवढा हिरमोड झाला म्हणून सांगू, चांगला फोटोग्राफर घेऊन गेले होते सोबत पण तेवढ्यासाठी राहिलं"
तेवढ्यात एक भिकारीण तिथे आली ,ती व्रुद्ध होती, तिचे कपडे फाटके होते, केस विस्कटलेले होते, चेहराही काळवंडलेला होता. "ताई भूक लागली.." पुढे तिला बोलूही न देता तिला बघताच ती फोनवर बोलणारी बाई जवळ जवळ किंचाळली, "ए चल चल लांब हो, माझ्या ट्वेंटीटू कॅरेटचा हार बघून आली ही चोरटी कुठली. चल निघ इथून."
" ही भिकारडी माणसं एवढी वाढलीत आजकाल...." ती पुन्हा फोनवर बोलू लागली.
एवढा वेळ विद्याला त्या साऱ्या संभाषणाची गंमत वाटत होती आता मात्र तिला त्या बाईच्या विचारांची कीव वाटू लागली. तिने त्या भिकारिणीला जवळ बोलावलं .पर्स मधला बिस्कीट चा पुडा काढून तिच्या हाती ठेवला, जवळची पाण्याची बाटली पाणी पिण्यासाठी तिला दिली. तेवढ्यात बस आली, विद्या बस मध्ये चढली बस पुढे निघाली. ती भिकारीण म्हणाली , "ताई तुमची पाण्याची बाटली..." विद्याने हातानेच तिला राहू दे म्हणून सांगितलं . त्या भिकारिणीने हात जोडले तोवर बस पुढे निघूनही गेली होती .
By Mrs. Ritu Patil Dike
Comments