खिंड अखंड लढणार
- hashtagkalakar
- May 11, 2023
- 1 min read
Updated: Jun 24, 2023
By Nikhil Datar
या बाजीसवे खिंड ही अखंड रे लढणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...धृ
वाट अथक पाहिली तेव्हा लाभला चिराग ऊन पाऊस वादळी त्याचा न होवो भडाग हा दीपक आपुले उद्याचे भविष्य रे तारणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...१
पुनवेची ही रात परि नको चित्ती संदेह शिव श्वास श्वास राखू होईल जीव विदेह हा अट्टहास यासाठी की जन्म सार्थ होणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...२
जसा सूर्य गिळावया फेके राहू केतू फास तसा शिवबास धरावया करे सिद्दी तपास चला गड्यांनो झणी नको मनी अन्य विचार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...३
या निबिड अरण्याची नका करु व्यथा तमा जळू विंचू सापांची वेदना ही सोसेल आत्मा चूल मांडली स्वराज्याची विझू न देऊ अंगार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...४
आला गनिम हो शिरी मी थांबतो इथे राजे देहाची भिंत करुनि झुंजतील बांदल माझे तीनशे मावळ्यांसवे ही खिंड मी राखणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...५
लाखांचा पोशिंदा आज लागलाय रे पणास रायाजी फुलाजींसवे मी जातो निजधामास काळही सम्मुख येता बाजी नाही हटणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...६
...२
...२...
तोफांचा बार नाही तोवर लढेल हा पठ्ठा चतुः प्रहर चालली झुंज शर्थ झाली आता संदेश न मिळे तोवर मी इथेच झुंजणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...७
अन धडाड वाजता बार, खिंड धन्य झाली बांदल रक्ताने न्हाऊन माती पावन झाली हा संग्राम कोरण्या येथे मी अखंड राहणार हा स्वराज्यधर्म माझ्या प्राणांती मी जपणार...८
By Nikhil Datar