कधी होशील माणूस
- Hashtag Kalakar
- Nov 30
- 1 min read
By Mr. Nivrutti Balashiram Korade
का दुजा भाव होतो तुझ्याशी,
काय कमी आहे तुझ्या मनगटाशी.
जन्मा आधी होते भ्रूण हत्या तूझी,
तरी नाही तुला तमा कुणाची.
असूनही तू जगतजननी,
तरी तू असशी करंटी जनी.
दिली तू तुझी ओटी तयांशी,
का प्रतारणा मग तुझी अशी.
तुझी परवड त्या साक्षी सारखे,
का लागतेय तुझ्या गळा ती नखे.
कुणी तुझी हत्या,कुणी अब्रू घेई,
कुणी तुझे तुकडे करी राई राई..
किती दर्शना अन् किती निर्भया,
किती सरस्वती अन् किती श्रद्धा,
तुलाच लढायचे आहे ह्या युद्धा..
नको हार मानू ह्या हैवांनाशी,
तू आहे सावित्री,जिजाऊ जशी.
तूच दे आत्ता गर्भ संस्कार,
दे मंत्र भेदण्या चक्रव्यूह पार.
जागा हो नरा नको त्रागा करूस,
माणसा माणसा कधी होशील माणूस???
नारी वाचून जन्म अधुरा,
कधी कळणार तुला हे नरा.
कुणाला तिच्या प्रीतीचा अर्थ न उमगे,
का न त्यांना राधा कृष्ण उमगे.
एक तो राजा होता शिवाजी,
वदला मंत्र पर स्त्री माता जशी जी..
कर नारी चा सन्मान हाच नारा खरा,
हाच तुला मंत्र हाती घेऊन निखारा..
हात क्रूर नराधमांचे,निष्ठुर
करी लेकींचे आयुष्य बेरंग
असते राजे शिवाजी इथे
केला असता त्यांचा चौरंग..
By Mr. Nivrutti Balashiram Korade

Comments