By Mrs. Ritu Patil Dike
"आई आजारपणातही कामाला लागायचं?" ईशा म्हणाली.
"काही नाही होत ग मला. बरं वाटतंय आता, दिवाळी जवळ असताना झोपून राहणं म्हणजे घरात शून्य उत्साह, तो नकोय मला म्हणून जरा हात पाय हरवते आहे एवढंच." ,आई.
"पण मी टाकली आहे ना सुटी. मी करते लक्ष्मी काकूंच्या मदतीने " आईच्या हातातला झाडू जवळजवळ काढून घेत ईशा म्हणाली.
"आणि हे बाबा काय करतायेत? बाबा नका ना तुम्ही एवढ्या जड कुंड्या उचलू. त्यांना स्वच्छ करणे आणि रंगवणे हे काम फक्त माझं आहे. तुम्ही कसं काय हाती घेतलं?".
"अग बाळा तू सारंच करतेस एवढं छोटसं काम मी केलं म्हणून काय झालं? तेवढंच माझंही मन रमतं आणि तुलाही मदत."
" ते काही नाही तुम्ही दोघांनी फक्त विश्रांती घ्यायची मी आणि काकू बघतो काय करायचं ते."
" तू का अशी हट्टी निपजलीस, आमचं काही म्हणजे काही ऐकत नाहीस" आई बाबा एकाच सुरात लटक्या रागाने बोलले, आणि ईशा त्यावर डोळे मिचकावत हसली. गेल्या वर्षीचं दिवाळीतलं हे संभाषण ईशाला आठवलं. आई-बाबांच्या आठवणीने तिचं मन कासावीस झालं. मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवसांतच दोघेही ईशाला सोडून गेले आणि ती एकाकी झाली. आज रविवारचा दिवस असल्याने ईशाने दिवाळीची साफसफाई करायचं ठरवलं खरं, पण तिला त्यात उत्साह वाटे ना. आजही लक्ष्मी काकू येणार होत्या त्या येईतोवर तिने ड्रॉवर साफ करायला घेतला, त्यातील जुनी कागदं, बिलं ती सॉर्ट करू लागली आणि तिच्या हाती एक लिफाफा लागला. "प्रिय इशास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा" त्यावर लिहिलं होतं, गेल्या वर्षीची तारीख होती. ईशाने घाई घाईने तो लिफाफा उघडला त्यात एक पत्र होतं. इशा वाचू लागली,
प्रिय इशा,
किती करतेस आमचं. आम्ही जुनी खोडं तुझी कुठलीच मदत करू शकत नाही आणि त्यात ही आजारपणं, असो. लहान-सहान गोष्टींना सॉरी किंवा थँक्यू म्हणणं हे इंग्रजी लोकांसारखं आम्हाला जमत नाही . तुम्ही पोरं चार पुस्तकं शिकलात आणि त्याबरोबर हे कौशल्यही शिकलात पण आम्हाला ते काही केल्या जमत नाही. पण म्हणून त्या भावना व्यक्तच होऊ नयेत असंही नाही. आजच हे पत्र त्यासाठीच . बाळा आजवर आमच्यासाठी खूप केलंस, कोरोनाच्या पहिल्या लाटेत अजय गेला तेव्हा आम्हा साऱ्यांना तुझी खूप काळजी वाटत होती. पाच वर्षांचं नातं, त्यानंतर लग्न. लग्नाला जेमतेम वर्ष झालेलं संसाराची सुरुवात झाली आणि तोच शेवटही. पण कमी वयात किती धीराची गं तू. नवरा गमावलास पण आमच्या आजारपणापुढे स्वतःचे दुःख मनात ठेवून आम्हाला सावरलंस ,जपलंस. स्वतःच्या एवढ्या वाईट मनस्थितीतही आईच्या केसांना तेल लावण्यापासून ते माझा व्यायाम करून घेण्यापर्यंत साऱ्या गोष्टी किती प्रेमाने केल्यास. आमच्या जेवणाच्या वेळा, औषधांच्या वेळा यावर तुझं किती काटेकोर लक्ष असतं. आमची माय झालीस तू. आमची पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून तू आमच्या आयुष्यात आलीस. या साऱ्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मलाही तर ही नेहमी म्हणते, "इशा माझ्या पोटी जन्माला आली असती तर किती बरं झालं असतं." आमच्या प्रेमाची यापेक्षा मोठी पावती ती तुला काय द्यावी बाळा? तुझ्या सारखी सून आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य, त्यासाठी देवाचेही खूप खूप आभार. आम्हा दोघांचेही आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, खूप सुखी राहा राजा. पुन्हा एकदा तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझेच आई-बाबा.
पत्र संपलं आणि लक्ष्मी काकू घरात आल्या, त्यावेळी ईशाच्या हातातील कागद भिजून चिंब झाला होता.
By Mrs. Ritu Patil Dike
Comments