By Mrs. Ritu Patil Dike
" अहो लता काकू, येताय ना मंदिरात?", बाहेरून हाक ऐकू आली. "हो हो आले" म्हणत लता काकू लगबगीने उठल्या, डायनिंग वरची फुलांची पिशवी घेतली आणि दाराला कुलुप लावून घेतलं. शेजारच्या विणाकाकूंबरोबर आज मंदिरात हरिपाठासाठी जायचं ठरलं होतं. विणाकाकू फाटकात उभ्या होत्या त्यांना पाहून लता काकू भरभर चालत आल्या आणि पुन्हा फाटकाला कुलूप लावून घेतलं.
" का आज सूनबाई नाही का घरी? रविवार आहे ना? नाही दाराला कुलूप लावताय म्हणून आपलं विचारलं?" विणाकाकू म्हणाल्या.
" नाही ती आणि ऋषिकेश दोघेही सिनेमा बघायला गेलेत आज. रोज दोघेही सकाळी लवकर जातात, संध्याकाळी उशीर होतो ऑफिसमधून यायला, दोघांना एकत्र असा निवांत वेळच मिळत नाही. म्हणून मीच म्हणाले त्याला मेधाला घेऊन बाहेर जाऊन ये जरा." लताकाकु मनातलं सरळ बोलून गेल्या.
" फारच लाड करता बाई तुम्ही सुनेचे. मला नाही जमत. एवढं काय त्यात? आपल्या वेळी तरी कुठे मिळायचा आपल्याला आपल्या नवऱ्यांबरोबर वेळ? सेपरेट बेडरुम कशी असते ते तरी माहीत होतं का आपल्याला? नवीन पोरांचे फारच चोचले आहेत बाई."
विणाकाकुंच्या बोलण्याचा रोख कळून लता काकू हसल्या आणि शांतपणे म्हणाल्या , "अहो आपल्या वेळी सारंच वेगळं होतं, तेव्हाची समीकरणं आता कशी लागू पडतील?"
त्यांचं बोलणं पूर्ण न होऊ देताच विणाकाकू म्हणाल्या , "नाही बाई, मला नाही पटत. आमच्या घरी नाही आम्हाला कधी अशी सूट मिळाली. रांधा वाढा उष्टी काढा एवढंच काय ते आयुष्य."
"अहो शिकलेल्या, स्वावलंबी असणाऱ्या मुलींच्या इच्छा, अपेक्षा सारं वेगळं असणार..."
पुन्हा त्यांचं बोलणं मध्येच थांबवत विणाकाकू म्हणाल्या, "अहो शिक्षणाचं काय एवढं? आपण कमी शिकलो, नोकऱ्या केल्या नाही म्हणून संसारात कुठे कमी पडलो का? नेटाने करतो आहोत की इतकी वर्ष. सासूबाईंनी बसल्याजागी होतील तेवढी कामं केलीत होत्या तोवर, त्यापलीकडे कधी कसलीही मदत झाली नाही. पाहुणे सतत असायचेच, नणंदांची लग्नं केलीत, त्यांचे सणवार, बाळंतपणं सारं काही केलं पण कधी मेलं जीवाचं कौतुक केलं नाही. आजकालच्या मुलींसारखं."
विणाकाकुंच्या बोलण्यातली उदासिनता लताकाकुंना कळून चुकली होती. त्यांना शांत करण्यासाठी त्या बोलू लागल्या, "बरोबर आहे तुमचं , जबाबदाऱ्या फार होत्या आपल्यावर. पण काळानुसार जबाबदाऱ्यांचे प्रकार बदलत आहेत. नोकरी करणे हल्ली मुलींसाठी आवश्यक झाले आहे, पाहुणे म्हणाल तर पूर्वीसारखा आजकाल कोणाकडे वेळ नाही कुणाकडे जाऊन राहण्यासाठी आणि खरं सांगू? माझ्या सासूबाईंनी मला कधी यांच्याबरोबर सिनेमाला पाठवलं नसेलही पण "बस जरा, दोन घास खाऊन घे. दमली असशील" या त्यांच्या शब्दांनी त्यांच्या मनातील ओलावा मला नेहमी जाणवला. तेच मी माझ्या सुनेच्या बाबतीत करते आहे फक्त जरा वेगळ्या प्रकारे, एवढंच."
"देवजाणे तुम्हाला कसं पटतंय . मला तर अजूनही पटत नाही. रोज रोज बाहेर पडतात या मुली नोकरीच्या निमित्याने तरी आपलं रविवारी तेच.माझ्याही घरी हाच प्रकार आहे. आपल्यासारखं नुसतं व्रतवैकल्यांसाठी घराबाहेर पडता आलं असतं तर कळलं असतं. आमच्यावेळी तर म्हणावं माहेरपणही फार कधी उपभोगता आलं नाही आम्हाला आणि यांना बघावं तर..."
विणा काकू न थांबता बोलत होत्या. लता काकू आता मात्र गालातल्या गालात हसत मंदिर केव्हा येतंय याचा अंदाज घेत होत्या.
By Mrs. Ritu Patil Dike
تعليقات